आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरच्या स्वतंत्र आयाम युवा व महिला मंचाच्या वतीने “शिव दीप प्रज्वलन” हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासनकर्ता, दूरदृष्टीचे धोरणकर्ते आणि आदर्श राष्ट्रनायक होते. त्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून जनतेच्या हक्कांचे, स्त्री-सन्मानाचे व धर्मनिरपेक्षतेचे रक्षण केले. त्यांची शौर्यगाथा, किल्ल्यांची उभारणी, प्रभावी गनिमी कावा युद्धनीती आणि सुयोग्य राज्यकारभार आजही तरुणाईस प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या विचारांतील राष्ट्रप्रेम, शिस्त, न्यायनिष्ठा व संघटनशक्ती यांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन अॅड. हेमराज काबलिया (उपाध्यक्ष, सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर) यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडून छत्रपतींच्या जीवनकार्याचा आढावा घेतला व प्रभावी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सरिता विकास घटे व श्री. विकास घटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. घटे दाम्पत्य हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत समाजसेवा करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे मार्गदर्शक अॅड. आशीष मुंधडा यांनी वैयक्तिक पितृशोक असूनही कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करून संस्थेप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शविली.
कार्यक्रमास संस्थेचे सदस्य अॅड. रोशनी कांबळे, अॅड. जितेंद्र केशवाणी, अॅड. धर्मेश जोशी, अॅड. आशीष रायपुरे, श्री. शत्रुघ्न कामडी, श्री. मोहन बैस तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इं. देवेंद्र काबलिया (सहसचिव, सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर) यांनी केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्माण, स्वाभिमान आणि सामाजिक एकात्मतेच्या विचारांना उजाळा देत तरुण पिढीमध्ये देशभक्ती व समाजसेवेची प्रेरणा जागृत करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply